कोल्ह्याची फजिती कोल्ह्याची फजिती एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एक दिवस तो शहराकडे आला. शहराच्या जवळ येताच, गावाभोवती असणाऱ्या काही कुत्र्यांनी त्याला पाहिले. कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आता आपल्यावर मोठे संकट आले याची जाणीव कोल्ह्याला झाली व तो जोरात पळू लागला. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला धोब्याचे घर त्याला दिसले. तो धावतच आत गेला. एका बाजूला असणाऱ्या कढईत त्याने उडी घेतली. धोब्याने कढईमध्ये कपड्याला देण्यासाठी वेगवेगळे पातळ रंग तयार केले होते. त्या रंगात कोल्हा पडला व त्याच्या सर्व शरीराला रंग लागला. थोड्या वेळाने आपल्यावरील संकट टळले आहे याची जाणीव होताच तो त्या कढईतून बाहेर आला व परत जंगलाच्या दिशेने पळत सुटला. जाताना एका कुत्र्याने त्याला पाहिले. त्याचा रंग बघून हा नवीन भयानक प्राणी कोण असावा? असा प्रश्न त्याला पडला व भीतीने तो धावत सुटला. कोल्ह्याला हे पाहताच आश्चर्य वाटले. थोड्या वेळात त्याच्या लक्षात आले की रस्त्यातील ज्या ज्या प्राण्यांनी त्याला पाहिले ते सगळे घाबरून पळत होते. आता आपल्याला सर्व ज़ण घाबरत आहेत, याचा अभिमान कोल्ह्याला वाटू लागला. तो अतिशय तोऱ्यात जंगलात परतला. त्या जंगलचा राजा असणाऱ्या सिंहाच्या विश्वासू घोड्याने त्याला पाहिले व अतिशय अदबीने विचारले, 'आपण कोण आहात?' यावर कोल्हा म्हणाला, 'मी आकाशातून आलो आहे आणि या जंगलाच्या राजाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. तू ताबडतोब सर्व प्राण्यांना याची कल्पना दे. मला शरण यायला सांग. नाहीतर या जंगलातील सर्व प्राण्यांचा मी घात करेल.' घोडा घाबरला. तो धावत सिंहाकडे गेला. त्याने घडलेली घटना सिंहाला सांगितली. सिंहही अतिशय घाबरला. आजपर्यंत कधीही न पाहिलेला एक नवीन राजा या ठिकाणी आलेला आहे. त्याची ताकदही मोठी असावी, असे त्याने सर्वांना सांगितले. सर्व जण मिळून त्या राजाच्या स्वागतासाठी गेले. एका उंच दगडावर कोल्हा अतिशय रुबाबदारपणे बसला होता. सिंह जवळ आला आणि त्याने कोल्ह्याला प्रणाम केला. कोल्ह्यानेही सर्व प्राण्यांचा मुजरा स्वीकारला. 'आजपासून मी या जंगलाचा राजा झालो आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या आज्ञेत राहावे.' असा आदेश दिला. त्या दिवसापासून कोल्ह्याचा रुबाब वाढला. त्याचा दरबार भरू लागला. त्याला मुजरा करण्यासाठी सर्व प्राणी येऊ लागले. त्याचे आयुष्य मजेत चालले होते. एके दिवशी असाच तो सिंहासनावर बसलेला असताना दूर जंगलात काही कोल्ह्यांची कोल्हेकुई त्याच्या कानावर पडली. खूप दिवसांनी आपल्या नातलगांचा आवाज कानावर पडल्यामुळे तो खूष झाला आणि आनंदाने त्याने ओरडायला सुरुवात केली. सर्व प्राणी आश्चर्यचकित झाले. सिंहासनावर बसलेला राजा कोल्ह्यासारखा ओरडतोय म्हणजे राजाचे सोंग घेतलेला कोल्हा आहे. कोल्ह्याने रंग बदलल्यामुळे आपण फसलो. हे सर्व प्राण्यांच्या लक्षात आले. सिंह अतिशय रागाने धावतच त्याच्या जवळ गेला आणि त्याने सिंहासनावरून कोल्ह्याला खाली खेचले व अपमानित करून तेथून हाकलून लावले.त्यात कोल्ह्याची फजिती झाली. तात्पर्य - खरे ते खरेच असते. सोंग कधीही लपत नाही.